अखेर ओला-उबर चालकांचा संप स्थगित

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – मुंबई, ठाणे, नवी मुंबई, क्षेत्रातील ओला-उबेर चालक आज पुन्हा एकदा संपावर गेले होते. ओला-उबर चालकांनी पुकारलेला संप अखेर स्थगित केल्याचे समजत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी हा संप मागे घेतल्याचे समोर आले आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर पहिल्या आठवड्यात ओला-उबर चालक संघटना प्रतिनिधी, ओला-उबर कंपनी व्यवस्थापक, परिवहन सचिव यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन या विषयी तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ओला-उबर चालकांनी आपला संप स्थगित केला.
दिवाळीची दिलेली डेडलाइन अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उलटून गेली होती. आणि म्हणूनच ओला-उबर चालकांनी संप पुकारला होता. विशेष म्हणजे संपाविषयी आमदार विद्या चव्हाण यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना धारेवर धरलं. या संपामुळे सामान्यांचे नव्हे तर आमदारांचेही हाल होत असल्याचं चव्हाणांनी रावतेंना सांगितलं.
रावतेंनी दिली अशी प्रतिक्रिया 
यावरच बोलताना, दळणवळणासाठी लोकल, बस, मेट्रोचे असे इतर पर्याय आहेत, असं दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर हा वाद कोर्टातला असून मी काय करु, असं म्हणत त्यांनी  काढता पाय घेतला होता. महत्त्वाचे म्हणजे रावतेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत चिडून कोण ओला-उबर? कोणी दिली त्यांना परवानगी असा उलट प्रश्नही विचारला होता.
ओला-उबर चालकांच्या मागण्या
– मिनी, मायक्रो, गो प्रती किलोमीटर 12 रुपये, बेस फेअर 50रुपये, वेटिंग टाईम 2 रुपये मिळावा
– प्राईम, सिडान प्रती किलोमीटर 15 रुपये, बेस फेअर 75 रुपये, वेटिंग टाईम 3 रुपये मिळावा
– xuv, xl, प्रती किलोमीटर 19रु, बेस फेअर 100रु, वेटिंग टाईम 4 रुपये मिळावा
– शेअर, पूल, मायक्रो, या सर्व बुकिंग मिनी आणि गोचा हिशेब (प्रती किलोमीटर 12 रुपये, बेस फेअर 50 रुपये, वेटिंग टाईम 2 रुपये) हा मिळावा
– रेंटल, हायर प्रती तासाला 250रु व 10 किलोमीटर हा मिळावा
– आऊटसाईड बुकिंग 150 किलोमीटरला 2000 रु 150 वरील किलोमीटर मिनी, गो 12 रु. प्राईम, सिडान 15 रु. Xuv, xl 19 किलोमीटर ने धावेल
– दोन (2)किलोमीटर वरील पिकअप फेअर मधे ऐड झाला पाहीजे. त्यामुळे बुकीग कॅन्सल होनार नाही. कंपनीचा व गाडी मालकाचा फायदा होईल
– गाडी पिकअप करण्यासाठी 500 मिटर जरी गेली व पिकअप आल्यावर 5 मिनिटा नंतर बुकीग कॅन्सल झाली तर कॅन्सल फी बेस फेअर च्या स्वरुपात मिळावी
– कंपनीने आपले कमिशन 15%+टॅक्स हा कट करावा
– हे सर्व रेट 24 तास लागू राहतील