अखेर 10 वी ची परीक्षा रद्दचा शिक्षण विभागाकडून शासन आदेश जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्दबाबत 21 दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेवर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. यासंदर्भात शिक्षण विभागाने आज (बुधवार) शासन आदेश जारी केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 20 एप्रिल रोजी केली होती. मात्र, शासन आदेश जारी करण्यात आलेला नव्हता.

शालेय शिक्षण विभागाने बुधवारी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अंतर्गत मुल्यांकन आदी विषयी धोरण ठरविण्यचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विनिमय 1977 मध्ये असलेल्या परीक्षा, निकाल आदींसाठीच्या संहितेत परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात तरतूद नव्हती. यामुळे आता मंडळाच्या संहितेत बदल करण्यात येणार असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. त्यासाठी मंडळाने कार्यवाही करावी, असेही आदे देण्यात आले आहेत.

इयत्ता दाहवीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच 11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश जारी करण्यात येणार आहेत.