अबब ! बँकांमध्ये जमा झालेत 35000 कोटी अन् ते घ्यायलाच नाही कोणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पैसा कोणाला नको असतो. पैसा मिळवण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. पण बँकेत इतकी रक्कम आहे ती घेण्यासाठी कोणी वर्षोनवर्षे फिरकलंही नाही. देशातील विविध बँकांमध्ये एक-दोन लाख नाही तर तब्बल 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. ती घेण्यास कोणीही आले नाही. बँकेतील हा सर्व पैसा फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि करंट अकाउंट, सेव्हिंग डिपॉझिटमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत कोणी क्लेम केला नाही. या अनक्लेम्ड् रकमेची माहिती केंद्र सरकारकडून आता घेतली जात आहे. जर तुमचे पैसेही अशाच प्रकारे अडकले असतील तर घाबरून जाऊ नका, कारण तुम्हाला तुमचे पैसे मिळतील.

असा मिळेल तुम्हाला तुमचा पैसा
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीवास यांनी सांगितले, की बरेच लोक एकापेक्षा जास्त बँक खाते उघडतात. तिथं त्यांचे 500 ते 1000 रुपये जमा असतात. पण बँक त्या पैशांवर काही तरी चार्ज लावेल, त्यामुळे अनेकजण बँकेत जात नाहीत. पण फक्त ज्या बँकांमध्ये मिनीमम बॅलेन्स ठेवणे बंधनकारक आहे तिथंच दंड आकारला जातो. पण ज्या बँकेत अशी कोणतीही मर्यादा नसते त्या बँकेकडून आपली रक्कम व्याजासह परत मिळू शकते.

अनक्लेम्ड् पैसा जातो तरी कुठं?
बँकांमध्ये जमा झालेली रक्कम दर दहा वर्षांनी RBI ला दिली जाते. RBI ही सर्व रक्कम ‘डिपॉजिटर एज्युकेशन एँड अवेरनेस फंड’मध्ये (DEAF) जमा करते. ज्याचा मुख्य हेतू डिपॉझिटर्सच्या हिताला प्रोत्साहन देणे आहे. तसेच या रकमेतील काही भाग सीनिअर सिटीझन वेल्फेअर फंडातही जमा केली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे निर्णय घेता येऊ शकतात.