‘बाला’मुळे अभिनेता आयुषमान खुरानाच्या अडचणीत प्रचंड वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  हटके विषय देत अनेक सिनेमात काम करत स्वत:ला सिद्ध करण्यात अभिनेता आयुषमान खुराना यशस्वी झाला आहे. असे असले तरी आता आयुषमान अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. आगामी सिनेमा ‘बाला’ हे त्याचे कारण आहे. आयुषमान सध्या याच सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होता. अशातच आता त्याच्यावर सिनेमाची कथा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. कमलकांत चंद्रा यांनी याबाबत तक्रार दिली आहे. आयुषमान खुराना, दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजान यांच्याविरोधात चंद्रा यांनी तक्रार केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात कलम 420 आणि कलम 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या काशिमीरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलकांत चंद्रा यांचं असं म्हणणं आहे की, आयुषमानच्या बाला या सिनेमाची कथा ही त्यांच्याच एका प्रोजेक्टमधून चोरली आहे. दरम्यान चंद्रा यांनी याआधीही या सिनेमाच्या मेकर्सविरोधात मुंबई हाय कोर्टात केस दाखल केली होती असेही समजत आहे. मागील महिन्यातच आयुषमानने या सिनेमाची घोषणा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून केली होती. वय होण्याआधीच टक्कल पडलेल्या व्यक्तीची कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/BxHWGtzhVap/?utm_source=ig_embed

याबाबत बोलताना चंद्र म्हणतात की, “हाय कोर्टात केस दाखल केली असतानाही सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणे हे चुकीचे आहे. इतकेच नाही तर कोर्टाचा निर्णय आला नसतानाही शुटींगला सुरुवात करणे हा कोर्टाचा एक प्रकारे अवमान आहे.” असे ते म्हणाले.