चंदा कोचर यांच्या विरोधात FIR दाखल करणाऱ्या ‘त्या’ सीबीआय अधिकाऱ्याची बदली

दिल्ली : वृत्तसंस्था – ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांच्या विरोधात FIR दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी सुधांशु मिश्रा या CBI अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. आता त्यांना बँकिंग सेक्युरिटी अँड फ्रॉड म्हणजेच बीएसएफसी सेल रांची येथील आर्थिक गुन्हेशाखेत पाठविण्यात आले असून त्यांच्या जागी विश्वजित दास यांची नियुक्ती करण्यात अली आहे. दास हे यापूर्वी कोलकत्ता येथील आर्थिक गुन्हेशाखेचे एसपी होते.

व्हिडिओकॉनला कर्ज देतांना गैरव्यवहारांचा कोचर यांच्यावर आरोप..

कोचर यांनी 3250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयने त्यांचे पती दीपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉन समूहाचे एमडी वेणुगोपाल धूत यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. व्हिडिओकॉन कंपनीच्या तसेच दीपक कोचर यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयांवर तपास संस्थेने छापे टाकले होते. ICICI ने 2012 साली  व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज दिले होते. यापैकी काही रक्कम व्हिडिओकॉनने न्यूपॉवर रिन्युएबल्समध्ये गुंतवल्याचे आरोप आहेत. न्यूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी दीपक कोचर यांच्या मालकीची आहे.

उद्योग समूहाने यापैकी 86% टक्के रक्कम म्हणजेच 2,810 कोटी रुपयांची परतफेड केली नाही. कर्जाला मंजुरी देणाऱ्या समितीमध्ये चंदा कोचर सहभागी असून त्यांनी कर्ज देतांना पक्षपात केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्यावर लावल्या गेलेल्या आरोपांची सध्या चौकशी सुरु असून ICICI देखील या गैरव्यवहार प्रकरणी स्वतंत्र चौकशी करत आहे.