पुणे ते दुबई विमानप्रवास करणाऱ्या ‘कोरोना’ पॉझिटिव्ह 30 वर्षीय महिलेविरुद्ध FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – करोनाबाधित असताना देखील पुण्यातून दुबईला विमानाने प्रवास करणाऱ्या महिलेविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपाय योजनांचे जाणून बुजून उल्लंघन करुन, हा व्हायरसविण्यात कारणीभूत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी डॉ. अमित आबासाहेब माने यांनी फिर्याद दिली आहे. तर 30 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ; 11 जुलै रोजी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणार्‍या महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. संबंधित महिलेने खासगी रुग्णालयात टेस्ट केल्यानंतर पॉजीटिव्ह असल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यानुसार तेथील डॉक्टरांनी सौम्य लक्षण असल्याने महिलेला होम क्वारंटाइन होण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे संबंधित महिला शुक्रवारपर्यंत सहा दिवस घरात क्वारंटाइन होती. मात्र, त्यानंतर आता ही महिला दुबईत राहत असलेल्या पतिकडे विमानाने गेली . सोसायटीधारकांनी यावर प्रश्न निर्माण करत, ही महिला खोट बोलून विमान प्रवास करून दुबईला गेल्याचे पोलिसांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सदर महिला एयर पोर्टवर शुक्रवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास उतरली तेथून ‘मी आता एयर पोर्टवर उतरली आहे, येथे शारजा इंटरनॅशनल एयर पोर्टवर माझी कोविड 19 तपासणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे’ असा व्हाट्सएपवर डॉक्टरांना मेसेज केला. पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध भा.द.वी. कलम 188, 269, 270, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 2,3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.