लॉकडाऊन अन् संचारबंदी चालू असताना बड्या पोलिस अधिकार्‍याचं तोडपाणी, 50 लाखाच्या लाचेचं प्रकरण, चौघांविरूध्द FIR

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 31 मे पर्यंत संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे तर सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्य पोलिस दलातील एका बडया पोलिस अधिकार्‍यांनं मोठं तोडपाणी केल्याचं समोर आलं आहे. 50 लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 12 लाख 50 हजार रूपयांवर प्रकरण सेटल करण्यात आलं. दरम्यान, तक्रारदारानं अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली आणि लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकार्‍यांसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संपुर्ण राज्य पालिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दिलीप सावंत (उपविभागीय पोलिस अधिकारी, शहापूर, ठाणे ग्रामीण), ओंकार पातकर, आकाश सावंत आणि सचिन रांजणे (खासगी व्यक्ती) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच मागणी प्रकरणी पडताळणी करण्यात आली होती. तक्रारदाराविरूध्द किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयात जामिन देण्यासाठी आणि मदत केल्याबद्दल तसेच गुन्हयातून मुक्तता करण्यासाठी आणि गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून देण्यासाठी आरोपींकडून 50 लाखाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 12 लाख 50 हजार रूपयांवर सेटलमेंट झाली. लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार नोंदवली आहे.