‘हा’ ठरला महाराष्ट्रातील पहिल्या मराठा जात प्रमाणपत्राचा मानकरी 

जालना : पोलीसनामा आॅनलाईन – एक विद्यार्थी पहिल्या मराठा जात प्रमाणपत्राचा मानकरी झाला आहे. महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि यानंतर महाराष्ट्रात पहिल्या मराठा जात प्रमाणपत्राचं वाटपंही झालं. वैभव ढेंबरे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे अवघ्या एका तासातच हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.

वैभव ढेंबरे हा अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. वैभव यानं अंबड तहसील कार्यालयापासून जवळच असलेल्या महा- ई-सेवा केंद्रात जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर त्याने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि त्यानंतर त्याच्या सर्वकागदपत्रांची पडताळणी करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ते पाठवण्यात आलं. सर्व पडताळणी झाल्यानंतर अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वैभवला देण्यात आलं. दरम्यान वैभव पहिल्या मराठा कास्ट सर्टिफिकेटचा मानकरी झाला आहे.

आपण मराठा कास्ट सर्टिफिकेटचा मानकरी झालाे याबद्दल प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याने त्याचा आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले. मराठा आरक्षण मिळावं यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष सुरू होता, तो या प्रमाणपत्रामुळे संपला असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. मुख्य म्हणजे या जात प्रमाणपत्राचा त्याला त्याच्या पुढील शिक्षणासाठी फायदा होणार आहे हे मात्र नक्की.

मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गासाठी आवश्यक असणारं जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या १६ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. यानंतर जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याबाबत सरकारने शासन निर्णय जारी केला असल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर सदर दोन्ही प्रमाणपत्र कशी असतील याचे नमुने प्रसिद्ध केले.

मेगा भरतीतही मराठा समाजाला फायदा
दरम्यान नुकतीच मुख्यमंत्र्यांनी राज्यात 75 हजार जागांची मेगा भरती होणार असल्याची घोषणा केली होती. महत्त्वाचे म्हणजे  या मेगा भरतीत मराठा समाजाला या प्रवर्गाचे फायदे मिळावेत आणि आगामी मेगा भरतीत सोईचे व्हावे म्हणून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.