लैंगिक अत्याचार प्रकरणी पहिला आरोपी फासावर लटकणार, जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय

भोपाळ : वृत्तसंस्था – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला फाशी देण्याचा कायदा संमत झाल्यानंतर मध्य प्रदेशमधील जिल्हा सत्र न्यायालयाने लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींना मध्य प्रदेशमधील जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी फाशी देण्यात येणारा हा पहिलाच निकाल आहे. एका शिक्षकाने आपल्या शाळेतील 4 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी सतना न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली असून 2 मार्च रोजी फाशी देण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकी घटना काय ?

महेंद्रसिंग गोंड नाव असणाऱ्या शिक्षकाने आपल्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीतील मुलीचे अपहरण केले. यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही. लैंगिक अत्याचार केल्यानंतर सदर मुलगी मृत झाली असे समजून गोंड याने त्या मुलीला जंगलात फेकून दिले. परंतु सुदैवाने मुलीच्या कुटुंबीयांना ती जंगलात जिवंत सापडली. त्यामुळे, कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. यावेळी त्या चिमुकलीची प्रकृती अत्यंत नाजूक होती असे आढळून आले. तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. त्यामुळे तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. लैंगिक अत्याचाराच्या काही तासानंतरच गोंड यास अटक करण्यात आली होती.

2 मार्च रोजी पहाटे 5.00 वाजता आरोपीस फाशी

गोंड यास 19 सप्टेंबर 2018 रोजी नागोड येथील सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. परंतु यानंतर दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरण मानत मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही 25 जानेवारी रोजी आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा ठोठवली. इतकेच नाही तर, आरोपी शिक्षकासाठी मृत्युदंडाचीच शिक्षा उचित असल्याचं मतही उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गोंड यास 2 मार्च रोजी पहाटे 5.00 वाजता फासावर लटकविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरी जबलपूर सेंट्रल जेलचे जेलर गोपाल तमराकर यांनी याबाबत भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपतींकडून या फाशीला स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याचं जेलर गोपाल तमराकर यांनी सांगितलं आहे.