होय, राज्यातील मत्स्य उत्पादनात 32 टक्कयांची घसरण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील मत्स्य उत्पादन मात्र 32 टक्कयांनी घसरले आहे. अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळांमुळे मासेमारीच्या दिवसांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटयूटच्या (सीएमएफआरआय) अहवालात मांडण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर यांत्रिकी बोटींच्या बेबंध मासेमारीमुळेदेखील मासेच कमी होत असल्याचे मच्छिमार संघटनांचे म्हणणे आहे.
देशभरातील सर्व किनारी राज्यांतील मत्स्य उत्पादनाचा आढावा सीएमएफआरआयकडून दरवर्षी घेतला जातो. त्यानुसार देशात 35 लाख 60 हजार टन मत्स्य उत्पादन झाले आहे. तर राज्यात एकूण 2.01 लाख मत्स्य उत्पादन आहे. हे प्रमाण देशातील एकूण मत्स्य उत्पादनाच्या 5.6 टक्के असून, मत्स्य उत्पादनात राज्याचा सातवा क्रमांक आहे. राज्यातील मत्स्य उत्पादनात बोंबील तिसर्‍या क्रमाकांवर असून, त्यामध्ये तुलनेने कमी घट झाली आहे. कोळंबीच्या उत्पादनातील घट मर्यादीत असली तरी पहिल्या पाच क्रमांकातील सर्वच माशांच्या उत्पादनात घट दिसून येते. एकूण उत्पादनात खोल पाण्यातील आणि महासागरी मासे अधिक आहेत.

गेल्या वर्षी अरबी समुद्रात सात वेळा चक्रीवादळ पूर्वपरिस्थिती (सायक्लोनिक डिस्टर्बन्स) तयार झाली. आतापर्यंतचे (1891 ते 2018) हे सर्वाधिक प्रमाण असून यापूर्वी 1998 मध्ये सहा वेळी चक्रीवादळ पूर्वपरिस्थिती झाली होती. या पूर्वपरिस्थितीचे चक्रीवादळात रुपांतर होऊन अरबी समुद्रात तीन चक्रीवादळे तयार झाली. या सर्व काळात मासेमारीचे दिवस घटले. त्यातच गेल्या वर्षी मान्सूनचा लांबलेला परतीचा प्रवासामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाता आले नव्हते. तर कैकवेळा समुद्रावरील बदलत्या परिस्थितीमुळे अर्ध्यातून परत यावे लागले होते. पावसाळा संपता संपता येणार्‍या मासळीचा उपयोग प्रक्रिया उद्योगात मोठया प्रमाणात केला जातो, मात्र त्यांची आवक घटली.