Pune News : ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री पुण्यात तब्बल 5 हजार पोलिस तैनात, गर्दीच्या ठिकाणावर राहणार ‘वॉच’

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी नववर्षाचे उत्साहात स्वागत करणा-या पुणेकरांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यातच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी खांद्यावर असलेले 5 हजार पोलीस यंदा रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, कुटुंबासमवेत नववर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

नव वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला रात्री शहरात तब्बल 5 हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी बॉम्ब शोधक, नाशक पथक, दामिनी पथक, साध्या वेशातील कर्मचारी, दंगल नियंत्रक पथक यांच्यासह स्थानिक पोलिस ठाण्यांचे पोलिस रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 5 जानेवारीपर्यंत शहरात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेसाठी संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या आदेशानुसार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रात्री 11 वाजण्याच्या अगोदरच बंद केले जातील. विनाकारण भटकंती, हुल्लडबाजी, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. शहरांतर्गत बंदोबस्तासाठी पाच हजारांवर फौजफाटा तैनात केला आहे. तसेच बॉम्ब शोधक, नाशक पथक, दामिनी पथक, साध्या वेशातील कर्मचारी, दंगल नियंत्रक पथक कार्यरत राहणार आहे.

शहरात 31 डिसेंबरला रात्री विविध भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा वेगळा बंदोबस्त असणार आहे. त्यांच्याकडून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.