मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिशय दुर्मिळ घटना घडल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत मुंबई पोलीस आयुक्तपदी ज्या वरिष्ठ पोलिसांची नियुक्ती झाली, त्या सर्वांना मावळत्या आयुक्तांनी पदभार दिला आणि आयुक्तांनी कार्यालय सोडले आहे. मात्र मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात प्रथमच असे घडले की, मावळत्या पोलीस आयुक्तांनी नवनियुक्त पोलीस आयुक्तांना आयुक्तपदाचा पदभार सुपूर्द न करताच त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला आहे. दरम्यान नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन सरकारी दस्तावेजांवर सही करून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी फक्त तेच उपस्थित होते. हा क्षण मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासातील अतिशय दुर्मिळ आणि न रुचणारा क्षण होता.

सचिन वाझे प्रकरणामुळे सध्या मुंबई पोलीसात मोठी खळबळ उडाली आहे. वाझेंच्या कारनाम्यांमुळे फक्त कनिष्ठ पोलिसांनाच वाजे प्रकरण भोवले नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील त्रास झाला आहे. यामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी पोलीस महासंचालकपदी असलेले हेमंत नगराळे यांची नाट्यमयरित्या नियुक्ती झाली आहे. सुरुवातीला परमवीर सिंग यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून लाचलुचपत, प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदींच्या नावाची चर्चा होती. होती. पण अचानक नगराळे यांची वर्णी लागली आहे.