बाळासाहेबांसाठी कायपण ! सलग तीन दिवस ‘या’ जिल्ह्यामध्ये दाखवला जाणार ठाकरे चित्रपट मोफत 

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित ठाकरे चित्रपट येत्या २५ तारखेला सर्वत्र प्रदर्शित होणार असून, बाळासाहेबांची आज ९३ वी जयंती आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘ठाकरे’ हा चित्रपट २५ ते २७ असा तीन दिवस रत्नागिरीतील लोकांना विनाशुल्क पाहता येईल.
शिवसेनेचा कोकणातील बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये ‘ठाकरे’ चित्रपट तीन दिवस मोफत दाखविण्यात येणार आहे. सर्व शिवसैनिकांना राधाकृष्ण सिटी प्राईड येथे सहा वेळा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत घेऊन याविषयी माहिती दिली. खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्या सहकार्याने चित्रपटाचे शो दाखवण्यात येणार आहे. तीन दिवस दररोज दोन शो असून दुपारी १२ ते ३ व रात्री ९ ते १२ या वेळेत ते होतील. २७ जानेवारीला शालेय मुले, कॉलेज तरुणांसाठी शो होणार आहे. तिकिटे चित्रपटगृहात उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे.
२५ जानेवारीला ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अभिजीत पानसेंनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली असून मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत अमृता राव दिसणार आहेत.