भाजपला आणखी एक झटका, माजी आमदार हेमेंद्र मेहता यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना आता शिवसेनेनं भाजपला आणखी एक झटका दिला आहे. माजी आमदार आणि भाजप नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे सलग दोन दिवसांत शिवसेनेनं भाजपला दुसरा धक्का दिला आहे.

माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्याने बोरीवलीत भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तर मेहता यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेची बोरीवलीत ताकद वाढली आहे. मेहता हे बोरीवली विधानसभेचे सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपला बोरीवलीत खिंडार पडले आहे.

हेमेंद्र मेहता यांनी आज सायंकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून मुंबईमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी झटणारे, सध्याच्या भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असणारे हेमेंद्र मेहता यांची पक्षात घुसमट होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, आमदार व विभाग प्रमुख विलास पोतनीस, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.