ग्रामपंचायत निवडणूक : रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात जुंपली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फ़ैरी झडत आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकां बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ३० लाखांचे बक्षीस जाहीर केलं आहे. त्यावरून भाजपचे माजी आमदार राम शिंदे (Former MLA Ram Shinde) यांनी रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या फॉर्मुल्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ३०लाखांचा भरीव निधी देऊ हे एक प्रकारचे प्रलोभन आहे. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने चौकशी समिती नेमून चौकशी करून दोषी असल्यास संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.त्यामुळे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) आणि माजी आमदार राम शिंदे (Former MLA Ram Shinde) हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्यास त्या ग्रामपंचायतमध्ये 30 लाखांचा भरीव निधी देण्याची घोषणा केली होती. यावर राम शिंदे म्हणाले,ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलेलं बक्षीस म्हणजे प्रलोभन आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, जनतेवर दबाव तंत्राचा वापर करणे, पैशाच आमिष दाखवणे, हा प्रकार गैर आहे. एखाद्या आमदारांनं विकासावर बोलावं. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार हे घटनाविरोधी बोलले. त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे.

राज्यात अशा पद्धतीनं निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील, असा खोचक टोला देखील राम शिंदे यांनी लगावला.

रोहित पवार यांचा राम शिंदेंवर पलटवार
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर विकास कामासाठी 30 लाखांचा भरीव निधी देण्यात येईल, असं मी म्हणालो, यात काय गैर आहे, असं रोहित पवार यांनी यांनी सांगितलं. राम शिंदे यांना कदाचित गावात गटतट असावे, असा त्यांचा प्रामाणिक हेतू असावा. गावात गटतट असल्यामुळे विकास खुंटतो. राम शिंदे काय म्हणतात, त्यापेक्षा लोकांना काय वाटतं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, असे सांगत आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.