सुनेच्या तक्रारीवरून शहरातील एका माजी आमदाराला राज्य महिला आयोगाची नोटिस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वैवाहिक समस्येबाबत राज्य महिला आयोगाकडे सुनेने तक्रार केल्यानंतर आयोगाने त्याची गंभीर दखल घेत माजी आमदारासह 6 जणांना नोटिस बजाविली असुन चौकशीसाठी दि. 26 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, आयोगाने पुणे शहर पोलिस आयुक्‍तांना पत्र पाठवुन माजी आमदाराच्या सुनेस संरक्षण देण्याबाबत कळविले आहे.

शहरातील एका माजी आमदाराच्या सुनेने वैवाहिक समस्येसंदर्भात ई-मेलव्दारे राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तक्रारीमध्ये माजी आमदार, त्यांचा मुलगा आणि इतर चार जणांची नावे नमुद करण्यात आली आहे. तक्रार अर्जात माजी आमदाराच्या सुनेने त्यांच्या जीवाला धोका असल्याचे देखील नमुद केले असून यापुर्वी संबंधितांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील नमुद केले आहे.

राज्य महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असल्याने आयोगाने माजी आमदाराच्या सुनेच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली असुन माजी आमदारांसह इतरांना चौकशीसाठी दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, आयोगाने पुणे शहराच्या पोलिस आयुक्‍तांना देखील पत्र व्यवहार करून सदरील प्रकरण कळविले असुन सुनेच्या मागणीनुसार त्यांना पोलिस संरक्षण देण्याबाबत कळविले आहे. दरम्यान, माजी आमदार ज्या परिसरात रहावयास आहेत त्या परिसरातील पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याला देखील आयोगाने सदरील प्रकरण कळविले असुन संबंधितांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. राज्य महिला आयोगाने माजी आमदार आणि इतरांना नोटिस बजाविली असुन त्यांना आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.