गांजाची शेती करणारे पोलीसांच्या जाळ्यात, तब्बल १ कोटींचा गांजा जप्त

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन – पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ कोटी, २ लाख, ७६ हजार, ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शिरपूर तालुक्यातील रोहिणीपैकी बोमल्यापाडा शिवारात शिरपूर येथे करण्यात आली. पोलिसांनी तब्बल १२ टन ७५० किलो वजनाची गांजाची हिरवी रोपे व आठ किलो १८० गॅम वजनाचा सुका गांज्यासह तीन मोटारसायकली जप्त केल्या. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिणीपैकी बोमल्यापाडा शिवारात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती शिरपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यासह पथकाने याठिकाणी धाड टाकली असता शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी एक कोटी, दोन लाख, ७६ हजार, ३६० रुपये किमतीची व सुमारे १२ टन ७५० किलो वजनाची गांजाची ओली रोपे तसेच आठ किलो १८० ग्रॅम वजनाचा सुका गांजा पोलिसांनी जप्त केला.

यावेळी पोलिसांनी दयाराम बोंबल्या पावरा यास ताब्यात घेतले तेव्हा मोटारसायकलवर आलेले अज्ञात तिघेजण पसार झाले. हे तिघे जण गांजा खरेदी करण्यासाठी आले होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, सहायक पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रमोद कुदळे, पोलिस उपनिरीक्षक दीपक वारे, हेकॉ राजन दुसाणे, लादूराम चौधरी, महेंद्र ठाकूर, दिनेश काळे, के.डी. ठाकरे, पोकॉ रवींद्र पवार, कैलास चौधरी, लक्ष्मीकांत टाकणे, मुकेश पावरा, प्रवीण गोसावी, प्रशांत पवार, बापूजी पाटील, गजेंद्र खलाणे, नाजेश शिरसाठ, वाघ, के.एन.महाजन, प्रकाश जाधव, पी.ए.कुलकर्णी, मनोज बागूल, वाय.व्ही.महाजन यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दीपक वारे यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दयाराम पावरा व मोटारसायकलीवरील अज्ञात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.