खंडणीप्रकरणी नगरसेवकासह ४ आरोपी फरार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – क्लासेस चालकाचे अपहरण करून २५ लाखांच्या खंडणीसाठी अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. शकील उर्फ सज्जन वलिमोहम्मद शेख व महावीर तुकाराम कांबळे अशी त्यांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणात नगरसेवक सचिन मस्केला अटक करण्यात आली होती तर आणखी एक नगरसेवक पुनित पाटील, एका संघटनेच्या प्रमुखासह चार जण फरार आहेत.

येथील ‘अध्यायन’ क्लासेसचे प्रा. विजयसिंह परिहार आणि प्रा. राजीव तिवारी यांना २५ लाखांची खंडणी मागत १० डिसेंबरला अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. घटनेनंतर भेदरलेल्या या प्राध्यापकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपबिती सांगितली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के आणि काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक पुनित पाटील यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी सचिन मस्के याला पहिल्याच दिवशी अटक केली होती तर अन्य सहा जण फरार होते. त्यातील दोन आरोपी शकील उर्फ सज्जन वलिमोहम्मद शेख (वय ३०, रा. बौध्दनगर, लातूर) व महावीर तुकाराम कांबळे (वय ३१, रा. आष्टा, ता. चाकूर) यांना रविवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
यातील महावीर कांबळे हा आरोपींच्या गाडीचा चालक असून तो यावेळी त्यांच्यासोबत होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा आता तीन झाला असून आता या प्रकरणातील अन्य चार आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन