ह्रदयद्रावक ! कोरोनाने अख्ख कुटुंब उद्धवस्त केलं; वृद्ध आईचा धक्क्यानेच मृत्यू

जळगाव : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीसोबतच कोरोनाबाधितांच्या मृतांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातून एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. रावेर तालुक्यातील सावदा गावात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर मुलांच्या मृत्यूच्या धक्क्याने वृद्ध आईचाही मृत्यू झाला आहे.

पुणे, मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्येसोबतच कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यातच सावदा गावातील घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाजी चौक परिसरात राहणाऱ्या पत्रकार कैलास परदेशी यांच्या घरात ही घटना घडली. कोरोना व्हायरसच्या संसर्गाने कैलास परदेशी, त्यांचे बंधू किशोर परदेशी आणि त्यांची वहिनी संगिता परदेशी या तिघांचा मृत्यू झाला. तर वृद्ध आई कुवरबाई परदेशी यांचा धक्क्याने मृत्यू झाला.

कैलास परदेशी यांच्यासह त्यांचे भाऊ आणि वहिनीचा मागील आठवड्यात कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. मुलांचा मृत्यू झाल्याचा मोठा धक्का बसल्याने त्यांच्या वृद्ध आईचाही मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.