Pune : मिलिटरी फार्मसची 39 लाखांची फसवणूक, हैदराबादच्या दोघा ठेकेदारवर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   हैदराबादच्या दोघा ठेकेदारांनी मिलटरी फार्मसची तब्बल 38 लाख 88 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सदर्न कमांड मुख्यालयातील मिलटरी फार्म येथे 29 जून 2012, 2 जुलै 2013 आणि 27 जानेवारी 2014 मध्ये घडला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मा देवी (आंध्रा सेल्स कॉर्पोरेशन रा. हैदराबाद) आणि मनोज अगरवाल (बालाजी कॉर्पोरेशन रा. मलाकपेठ, हैदराबाद) अशी गुन्हा दाखल केलेल्या ठेकेदारांची नावे आहेत. याप्रकरणी ले. कर्नल अविनाश शर्मा (वय 50 रा. फार्म हाऊस मिलिटरी, सिकंदराबाद) यांनी फिर्याद दिली आहे. कोरोनामुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याने फिर्यादीत म्हटले आहे.

कोरेगाव पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलटरी फार्म यांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी सदर्न कमांडमधील मिलटरी फार्मस यांनी निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत दोघांनी भाग घेतला होता. त्या प्रक्रियेत या दोन्ही फर्मनी 38 लाख 88 हजार 500 रुपयांची नुतनीकरण ठेव पावत्या व फिड पुरवठा करावयाचे हप्ते पावत्या सादर केला. त्यानुसार त्यांना अन्नधान्य पुरवठा करायचा ठेका मिळाला व त्यांनी कामकाज सुरु केले. त्यानंतर या दोन्ही फर्मनी दिलेल्या सुरक्षा ठेव पावत्यांची लेफ्टनंट कर्नल शर्मा यांनी हैदराबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडे शहानिशा केली. तेंव्हा बँकेने अशा प्रकारच्या पूर्वी नुतनीकरणाच्या कोणत्याही ठेवी न ठेवण्याबाबतची माहिती दिली. या दोन्ही संस्थांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी बनावट पावत्या तयार केल्या. तसेच त्या खर्‍या असल्याचे भासवून सदर्न कमांड कार्यालयात सादर करुन लष्कराची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.