फसवी कर्जमाफी, मी एक त्रस्त शेतकरी म्हणत शेतकऱ्याने काढले फडणवीस, ठाकरे सरकारचे वाभाडे

पोलीसनामा ऑनलाईन – अतिवृष्टीमुळे अन्नदाता शेतकरी कायमचं अडचणीत येत असतो. अशा शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारं नेहमीच कर्जमाफीची घोषणा करते. पण प्रत्यक्षात त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतो हा प्रश्नच असतो. अशाच एका कर्जमाफी न मिळालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उद्विग्न होऊन यापूर्वीच्या फडणवीस आणि आत्ताच्या ठाकरे सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. या शेतक-यांने चक्क आपल्या शेतातच मोठा फ्लेक्स लावत त्यावर फसवी कर्जमाफी’या मथळ्याखाली माजी मुख्यमंत्री फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो छापला आहे. या अनोख्या पद्धतीच्या आंदोलनामुळं गावात आणि माध्यमांनी दखल घेतल्यानंतर आता सर्वत्र या शेतकऱ्याच्या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील भिलखेड (ता. संग्रामपूर) येथील अल्पभूधारक शेतकरी निलकंठ लिपते यांची ही व्यथा आहे. दोन एकर शेती असलेल्या लिपते यांनी २०११ मध्ये दीड लाख रुपयांचं पीककर्ज घेतलं होतं. या कर्जमाफीसाठी त्यांनी मागच्या फडणवीस सरकारच्या काळात अर्ज केला होता. त्यानंतर सध्याच्या ठाकरे सरकारच्या काळातही त्यांनी पीक कर्जमाफीसाठी अर्ज केला. मात्र, या दोन्ही वेळेस त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. सरकार दरबारी वारंवार खेटे घालूनही शासकीय योजनांचा फायदा मिळत नसल्याने वैतागलेल्या लिपते यांनी आपल्या शेतातच मोठा फ्लेक्स लावत त्यावर फसवी कर्जमाफी या मथळ्याखाली फडणवीस आणि ठाकरे यांचे फोटो छापत त्यामध्ये या दोन्ही सरकारच्या कालावधीत माझी कर्जमाफी झालीच नाही, त्यामुळे मी एक त्रस्त शेतकरी असा संदेश लिहिला. त्याखाली त्यांनी आपलं नाव, संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ताही लिहिला. या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.