भाजप नेता आणि माजी मंत्र्याच्या मुलाला अटक, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करून जमवले होते 6 हजार लोक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गुजरातमध्ये कोरोना विषाणूमुळे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपचे माजी मंत्री कांती गामित आणि त्यांच्या मुलासह 18 जणांना अटक करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर तापीच्या सोनगारा पोलीस ठाण्यांतर्गत या क्षेत्रात ड्यूटीवर असणाऱ्या पोलिसांनाही निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

कांती गामितने आपल्या नातीच्या साखरपुडा सोहळ्यादरम्यान हजारो लोकांची गर्दी जमविली होती. सोहळ्यास झालेली गर्दी आणि गरबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते आणि माजी मंत्री कांती गामित तसेच त्यांच्या मुलासह 18 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हजारो लोक मास्क न घालता आणि सामाजिक अंतराच्या नियमांची ऐशी-तैशी करताना दिसले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. या घटनेची दखल घेत पोलिसांनी कांती गामित याच्याविरुद्ध कलम 308, कलम 188, 269, 270 आणि आयपीसीच्या साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुजरातमधील नेत्याला अटक करण्याची ही पहिली घटना आहे. त्याचबरोबर, व्हिडिओ समोर आल्यानंतर स्वत: कांती गामित यांनीही आपली चूक कबूल केली आहे. लोक सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करीत आहेत की, जेव्हा सामान्य माणसाच्या विवाहाची बातमी येते तेव्हा सरकार 100 लोकांना परवानगी देण्याची चर्चा करते, परंतु भाजप नेत्याच्या नातीच्या लग्नात 6000 हून अधिक लोक उपस्थित होते.