मंगळवारपासून फळे, भाजीपाला विक्री बंद, तोलाईच्या प्रश्नावर तोडगा नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तोलाईच्या प्रश्नावर अद्याप तोडगा न निघाल्याने हमाल, मापाडी, तोलणार आदी संघटनांनी मंगळवार रात्रीपासून फळे, भाजीपाला, कांदा बटाटा विभागही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित संघटना आणि भुसार व्यापार्‍यांत तोलाई प्रश्नावर तोडगा न निघाल्याने शनिवार पासून मापाडी आणि हमालांनी मार्केटयार्डातील भुसार बाजारात बेमुंदत बंद सुरू केला आहे. या विभागातील उलाढाल मंदावली आहे. भुसार विभागातील व्यापार्‍यांनी तोलाई देणे बंद केल्याच्या विरोधात दि पुना मर्चटस चेंबरच्या ईमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. या प्रश्नाबाबत हमाल, मापाडी, व्यापारी आणि बाजार समिती यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तोडगा न निघाल्याने मापाडी, हमालांनी शनिवारपासुन बेमुंदत बंद पुकारला आहे. उद्या (सोमवार ता.४) सकाळी १०:३० वाजता या संघटनांच्या वतीने पणन महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात तोलणार संघटना, हमाल पंचायत, टेम्पो पंचायत, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, महात्मा फुले कामगार संघटना सहभागी होणार आहेत. यासंदर्भात संघटनांनी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना निवेदन दिले आहे. तोलाई असावी का नसावी याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने तोष्नीवाल कमिटी नियुक्त केली आहे. या कमिटीचा अहवाल आठ दहा दिवसात येईल तोपर्यंत कोणीही ही आंदोलन करू नये. आंदोलन किंवा बेमुदत बंद केले तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असे पत्र संबंधितांना देण्यात आले आहे अशी माहिती प्रशासक देशमुख यांनी दिली.