एफटीआयआयच्या अध्यक्षपदी बी. पी. सिंग यांची वर्णी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( एफटीआयआय) च्या अध्यक्षपदाचा अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदावर बी. पी. सिंग यांची वर्णी लागली आहे.  सिंग हे एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सिंग यांनाच बढती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अडीच महिन्यांपूर्वी अनुपम खेर यांनी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे कारण पुढे करीत ट्विटरवरून एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यापासून या पदावर नसरूद्दीन शाह, गुलशन ग्रोव्हर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बी.पी सिंग यांनाच अध्यक्षपदी विराजमान करून निष्फळ चर्चाना एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे.

बी.पी सिंग हे एफटीआयआयचे १९७० च्या बॅचमधील सिनेमॅटोग्राफी अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. दूरचित्रवाहिनीवर गाजलेल्या ‘सीआयडी’ या मालिकेचे ते निर्माता-दिग्दर्शक आहेत. बी. पी. सिंग यांनी  एफटीआयआयच्या विद्या परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा २०१४ ते २०१७ या काळात सांभाळली आहे.

स्कीलिंग इंडिया इन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ( स्कीफ्ट) अंतर्गत देशभरात चित्रपट संस्कृती रुजविण्याकरिता २४ शहरांमध्ये १२० लघू अभ्यासक्रम चालविले या उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफटीआयआय पुढील वाटचाल करेल, असे एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅथोला यांनी सांगितले.