Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने फेब्रुवारी महिन्यात वारंवार पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ केली. यामुळे पेट्रोलचे दर शंभर रुपयांपर्यंत गेले तर घरगुती गॅसची किंमत शंभर रुपयांनी वाढली. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पेट्रोल पंपावरील जाहिरात बंद करावी. त्या जाहिरातीमधून नागरिकांची दिशाभूल केली जात असून ही जाहिरात सर्वसामान्यांच्या करातून केली जात असल्याचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

इंधन दरवाढीच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी रुपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध करत मोदींच्या फलकाखाली चूल आणि गॅस मांडून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, 500 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आज 800 रुपयांना घ्यावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात केलेली दरवाढीची ही तिसरी वेळ आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशावर टाकलेला हा दरोडा आहे.घरगुती गॅस दरवाढ झालेली खपवून घेतली जाणार नसल्याचे चाकणकर यांनी म्हटले.

चाकणकर पुढे म्हणाल्या, गॅस आणि शंभरी पार केलेला पेट्रोलचा दर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा आहे. ही दरवाढ सरकारने मागे घ्यावी. पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदींची जाहिरात करण्यासठी केंद्र सरकारने 5425 कोटी रुपये खर्च केले. यापुर्वी पंपावर उज्वला गॅस योजनेची जाहिरात होती. यामध्ये पाच कोटी कुटुंबांना उज्वला गॅस योजनेतून गॅस देण्याचे जाहिर करण्यात आले होते. योजना कोणापर्यंत पोहचली हा संशोधनाचा भाग असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. यावेळी महिलांनी इंधन दरवाढीच्या विरोधात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, संगिता ताम्हणे, प्रज्ञा खानोलकर, मनिषा गटकळ, पल्लवी पांढरे, ज्योती गोफणे, भारती कदम, मनिषा जठर, निर्मला माने, लता पिंपळे, प्रेमा शेट्टी, आरती जाधव, दिपाली देशमुख, संगिता आहेर, कविता आल्हाट, सरिता झिमरे, आशा शिंदे आदी उपस्थित होते.