शेतकऱ्यास मारहाण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर FIR

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरवाती जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सर्जे तालुक्यातील धनेगावात ही घटना घडली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली. आपल्या भावावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच लहान भावाला हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यानेही तिथेच प्राण सोडले. दोन शेतकरी भावांचा असा शेवट झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अशोक भुयार असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अशोक यांची तालुक्यातील संत्रा व्यापाऱ्याने फसवणूक केली. एवढेच नाही तर पोलीस उपनिरीक्षक आणि व्यापाऱ्याने त्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे अशोक यांनी मंगळवारी (दि.22) सकाळी आत्महत्या करुन आपले जिवन संपवले. अशोक यांना मारहाण करणाऱ्या संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले. गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव याच्यासह दोन संत्रा व्यापाऱ्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत अशोक भुयार यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठ्या भावाने आत्महत्या केल्याचा मोठा धक्का लहान भाऊ संजय भुयार यांना बसला होता. भावाला मुखाग्नी दिल्यानंतर संजय भुयार यांना त्याच ठिकाणी हृदयविकाराचा तिव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संजय यांना तपासून मृत घोषीत केले. कुटुंबातील दोन कर्त्यापुरुषांचा अचानक मृत्यू झाल्याने भुयार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अशोक भुयार या शेतकऱ्याने आपली संत्र्याची बाग विकली होती. मात्र, व्यापाऱ्यांनी अशोक यांना पैसे न देता त्यांनाच मारहाण केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या अशोक यांना पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव याने मारहाण केली. तसेच त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही. यामुळे निराश झालेल्या अशोक भुयार यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली व चिठ्ठी लिहून ठेवली.

पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

या प्रकरणात अंजनगाव सूर्जेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव आणि संत्रा व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांनी मारहाण केल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन या तिघांवर 306,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक जाधव घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी करत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी सांगितले.