मनोहर पर्रीकर अनंतात विलीन ; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पणजी : गोवा वृत्तसंस्था – मनोहर पर्रीकर यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय फळीतील अनेक नेते आज गोव्यात दाखल झाले होते. मनोहर पर्रीकरांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री मंडळातील सदस्यांनी पर्रीकरांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थितीत होते. कला अकादमीच्या इमारतीत पर्रीकरांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याने ते मागील काही महिन्यापासून त्रस्त होते. अखेर काल रविवारी पर्रीकरांची मृत्यूशी सुरू असणारी झुंज संपली आहे. मागील दोन दिवसापासून पर्रीकरांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. त्यांच्या राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. गोवा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांच्या पथकांनी त्यांच्यावर उपचार केले आहेत. काल रात्री ८ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट केल्यानंतर पर्रीकरांच्या निधनाची बातमी बाहेर पडली आणि त्यांचे लाखो चाहते पणजीच्या रस्त्यावर उतरू लागले. सामान्यांचा मुख्यमंत्री, गरिबांचा मुख्यमंत्री म्हणून पर्रीकरांची छबी देशभर प्रसिद्ध होती. त्यामुळेच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पणजीच्या रस्त्यावर मोठा जनसमुदाय उतरला आहे.

पर्रीकरांचे पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी आणल्यानंतर त्यांच्या पार्थिवावरील तिरंगी ध्वज त्यांच्या मोठ्या मुलाच्या हाती स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर हावेत बंदुकीच्या फौरी झाडून पर्रीकरांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यात आली. मनोहर पर्रीकरांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच उपस्थित जनसमुदायाला अश्रूचा बांध फुटला. मीरा मार बीचवर मनोहर पर्रीकरांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.