ऐकावं ते नवलच… ! इथे रातोरात गायब होतायत गाड्यांचे टायर  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काय चोरीला जाईल याचा नेम नाही. सोने, चांदी, हिरे मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे तुम्ही ऐकले असेल पण राजधानी दिल्लीत चक्क लक्झरीयस गाड्यांचे टायर चोरून नेले जात आहेत. विशेष म्हणजे गाडीचे टायर चोरून ती गाडी विटांच्या सहाय्याने जागेवरच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या गँग्ज ऑफ टायरचोरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यामुळे या गँग्स ऑफ टायरचोरांच्या या प्रतापामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राजधानीत रातोरात एकाच गाडीचे चारही चाके चोरीला जात आहेत. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आत्तापर्यंत डझनभरपेक्षा जास्त गाड्यांच्या टायरची अशाप्रकारे चोरी करण्यात आली आहे. येथील डीडीए ग्रीन एमआयजी फ्लॅट्समधील रहिवाशी सकाळी सकाळी घरातून बाहेर पडले तेव्हा, गाडीच्या टायर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. कारण, परिसरातील ५ ते ६ गाड्यांच्या टायरची अशाचप्रकारे चोरी झाली होती.

चोरांचा हा कारनामा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामध्ये चोर आपल्यासोबत विटा घेऊनच चोरीच्या उद्देशाने येत असल्याचे दिसून येते. तर, गाडीच्या खाली विटा लावून गाडीचे चारही टायर आणि बॅटरी काढून चोर पोबारा करतात. याप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले आहे, पण अद्याप कुठलिही ठोस कारवाई करण्यात आली नाही.