धक्कादायक ! अपहरण करून ५१ दिवस दलित मुलीवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका अल्पवयीन दलित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी तिंदवारी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील एका १६ वर्षीय दलित मुलीचे मोटारसायकलवर आलेल्या दोन युवकांनी अपहरण केले.

या मुलीला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिला सुरुवातीला हमीरपूर येथे नेण्यात आले. तेथे अपहरण करणाऱ्यांपैकी एका मुलाच्या बहिणीने जबरदस्ती तिच्या भांगेत कुंकू भरले. त्यानंतर या दोन युवकांनी तिला पंजाबमधील लुधियाना येथे डांबून तिच्यावर ५१ दिवस बलात्कार केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संधी मिळताच या मुलीने फोन करून आपण लुधियाना येथे असल्याची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर तिची त्या ठिकाणाहून सुटका करण्यात आली. या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक नीरज कुमार सिंह यांनी सांगितले कि, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तेरही माफी गावातील रामलखन, त्याची बहीण कलावती उर्फ कल्ली आणि त्यांच्या आणखी एका अज्ञात साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण, ऍट्रॉसिटी कायद्यानुसार आणि बलात्कार त्याचबरोबर कटात सामील होण्यासारखे गुन्ह्यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा तपास सुरु आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

आरोग्यविषयक वृत्त –