‘या’ तारखेच्या आधीच घरगुती गॅस बुक करा, किंमती भडकणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही अजून देखील घरगुती गॅस बुक केला नसेल तर करून घ्या कारण लवकरच घरगुती गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सीएनजी, पीएनजीमध्ये १८ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या १ एप्रिलपासून ही वाढ होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात मागणी जास्त झाल्यामुळे नैसर्गिक वायूंच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही दरवाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्याच्या गॅस धोरणानुसार केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूंच्या किमतींचा आढावा घेते. गेल्या वर्षभरात नैसर्गिक वायूच्या किमतीत दोन वेळा ५.९ टक्के आणि ९.८ टक्के वाढ झाली. मात्र लवकरच आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता आहे.

याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आंतराष्ट्रीय बाजारानुसार देशांतर्गत बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमती ठरतात. यामध्ये कोणताही सरकारी हस्तक्षेप करता येत नाही. दरम्यान यापुर्वी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत घट नोंदवण्यात आली होती मात्र त्यानंतर सातत्याने गॅस दरवाढीचा सिलसिला सुरूच आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कच्च्या तेलाच्या किंमतीत सात टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली होती. त्याचा परिणाम घरगुती गॅसच्या किंमतीवर देखील होतो. आता पुन्हा घरगुती गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.