सकारात्मक विवाह सोहळा ! गिफ्ट म्हणून वऱ्हाडी महिलांना दिलं ‘सॅनिटरी नॅपकिन’ ; परिसरात चर्चांना उधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यात झालेला एक अनोखा विवाह सोहळा हा चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाह सोहळ्यात वऱ्हाडी महिलांना वेगळीच भेट मिळाली. महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आले.

पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी वस्तीवर बीड जिल्ह्यातील भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे या दोघांचा शुक्रवारी विवाह झाला. दोघांचेही आईवडील शेतकरी. या दुर्गम वस्तीवर बहुतांश धनगर कुटुंब राहतात. भारत हा युवा चेतना फाउंडेशन या संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेतील युवकांनी आजवर अशाच आगळ्या प्रथा लग्नात रुढ केल्या आहेत. एका लग्नात पुस्तकांचा रुखवत होता. एका लग्नात साफसफाई मोहीम राबविण्यात आली. एका लग्नात वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. सॅनिटरी पॅड छान भेटवस्तूच्या स्वरुपात बंदिस्त करुन लग्नमंडपात जाहीरपणे वाटण्यात आले.

पुण्यातील समाजबंध संस्थेचे कार्यकर्ते सचिन, आशा, सुभाष यांनी मासिक पाळीत काळजी न घेतल्यामुळे गंभीर आजार जडतात. त्यामुळे यापुढे बाजारला गेल्यावर पत्नी, आई, बहिणीसाठी सॅनिटरी पॅड विकत आणत जा, असे आवाहन पुरुषांनाही केले.