काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे, म्हणाले – ‘मुली 15 व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग लग्नाचे वय 21 करण्याची काय गरज’

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यस्तरीय सन्मान अभियानात बोलताना “मला अनेकदा वाटते, मुलींचे वय १८ वरुन वाढवून २१ करण्याबाबत चर्चा व्हायला हवी, मी याला चर्चेचा मुद्दा बनवू इच्छितो. राज्य आणि देशाने यावर विचार करावा, म्हणजे यावर काही निर्णय घेता येईल,” असे म्हटले होते. त्यावर टीका करताना काँग्रेसचे नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांची जीभ घसरली आहे.

सज्जन सिंह वर्मा म्हणाले, “डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुली ह्या वयाच्या १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात. मग विवाहाचे वय २१ वर्षे करण्याची काय गरज आहे. यापूर्वीच विवाहाचे वय १८ निश्चित केले असताना ते वय तेवढेच का राहू दिले जाऊ नये,” असे वादग्रस्त वक्तव्य सज्जन सिंह वर्मा यांनी केले आहे.

दरम्यान, अभियानात बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले, “या अभियानाचा उद्देश महिलांविरुद्ध गुन्ह्यांचे निर्मूलन करण्यासाठी समाजाची सक्रिय भागीदारी निश्चित करणे, महिला आणि मुलींसाठी सन्मानजनक आणि अनुकूल वातावरण तयार करून सर्वसामान्य नागरिकांसाठी कायदेशीर तरतुदींबाबत जागरूक करण्याचा आहे. मध्य प्रदेशमध्ये गुन्हेगारांवर अंकुश लावण्याचे कार्य पूर्ण क्षमतेने केले जाईल. सर्वसामान्यांना कायद्याच्या राज्याची जाणीव करून दिली जाईल,” असेही त्यांनी सांगितलं.