औरंगाबाद पाठोपाठ नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून वाद !

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याला काँग्रेसने विरोध दर्शवला. त्यानंतर भाजपने हाच मुद्दा उचलत शिवसेनेला भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. सेनेनंही त्याला चोख उत्तर दिले आहे. हा वाद शमतो ना शमतो तोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) नावावरून वाद निर्माण झाला आहे. या विमानतळाला रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्या, अशी मागणी मनसेने केली आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांनी केली होती. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर याला रायगड आणि नवी मुंबई मनसेने विरोध केला आहे. मनसेने पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबईतील पनवेलमध्ये उभे राहत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे की, महाराष्ट्रातील एखादया भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे. मात्र, लोकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे. तसेच, दि. बा. पाटील यांचे नाव द्यायची मागणी असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करत जे राजकारण केले आहे, ते निंदनीय आहे, असेही काळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरूच आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर काँग्रेस नेत्यांचे अधिक प्रेम आणि श्रद्धा असणार, याची मला खात्री आहे, असे सांगून भाजपचे कान टोचले. तर २६ जानेवारीपूर्वी हे नामांतर केले नाही, तर आंदोलन करणार असल्याची भूमिका मनसेने घेतली.

नामांतराचा प्रस्ताव दुय्यम : अशोक चव्हाण
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्याबाबत सरकारकडे कुठलाच प्रस्ताव नाही. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम आहे. तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह हे राहणारच; परंतु सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसार हे सरकार चालविले जात आहे, असे सांगून सर्व आलबेल असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले.

अहमदनगरचेही नाव ‘अंबिकानगर’ करा
औरंगाबाद, नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून वाद सुरु असतानाच अहमदनगरचे नावही ‘अंबिकानगर’ करावे, अशी मागणी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे.औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये जोरदार आंदोलन केले.