गौरवास्पद …! भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राची शान भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणारी हिमा दास यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सने भारताची ‘३० अंडर ३०’ अशी यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत स्मृती आणि हिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा याचा देखील समावेश आहे.

दरम्यान फोर्ब्स इंडियाच्या ’30 अंडर 30′ या आवृत्तीचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे.फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीमध्ये प्रत्येक देशातील 30 वर्षांखालील युवकांचा सन्मान केला जातो. 30 वर्षांखालील ज्या व्यक्तींनी देदिप्यमान कामगिरी केली आहे, त्यांना या यादीमध्ये प्रवेश दिला जातो. या यादीत खेळाबरोबर एंटरटेनमेंट, मार्केटिंगसहित अन्य काही क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. या वर्षीच्या यादीमध्ये एकूण १६ क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. या यादीसाठी पहिल्यांदाच उद्योग, उर्जा, मार्केटिंग, मीडिया, कृषी या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे.

स्मृतीची नेत्रदीपक कामगिरी

महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत स्मृतीने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंड दौऱ्यात स्मृतीची बॅट चांगलीच तळपली होती. तिने पहिल्या सामन्यात शतकी खेळी करताना जेमिमा रॉड्रीग्जसह १९० धावांची विक्रमी भागीदारी केली होती. २०१८ या वर्षातील कामगिरीमुळे तिला आयसीसीने सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारानेही गौरविले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-1 अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. स्मृतीने २०१८ वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन डे सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( ७५१) ७० गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग ७६ गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हिमा दासची उत्कृष्ट कामगिरी

२५ ऑगस्ट २०१८ रोजी हिमा दासने आशियाई गेम्स सेमिफायनलमध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम केला होता. हिमाने आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स असोसिएशन फेडरेशन (आयएएएफ) २० वर्षीय ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. आसामची क्रीडा अ‍ॅम्बेसेडर म्हणून हिमाला घोषित करण्यात आले आहे.