छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर व पराक्रमी मराठा मावळयांना संबोधले आक्रमणकर्ते, गोव्याच्या टुरिझम विभागाचा प्रताप

पणजी : वृत्तसंस्था – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर व पराक्रमी मराठा मावळ्यांना आक्रमणकर्ते संबोधण्याचा संतापनजनक आणि तेवढाच अक्षम्य अपराध गोवा पर्यटन खात्याने केला आहे. आग्वाद किल्ल्यासंबंधी पर्यटन विभागाने केलेल्या ट्विटमध्ये मराठयांना आक्रमणकते संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान केला आहे. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर खात्याने हे वादग्रस्त ट्विट त्वरित मागे घेऊन सारवासारव केली. पण या प्रकारामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांनी गोवा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करताना भाजपच्या मॉडीफाइड इतिहासाच्या धोरणामुळे पराक्रमी मराठा साम्राज्याचा घोर अपमान झाल्याचे म्हटले आहे. सरकारने जनतेची व स्वाभिमानी देशभक्तांची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

या अपमानाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान संतापाची लाट पसरल्यानंतर पर्यटन खात्याने त्वरित ट्विट मागे घेऊन चुकीची दुरुस्ती केली आहे. तसेच ज्याने कोणी हा प्रकार केला त्याने माफी मागून खंतही व्यक्त केली आहे. परंतु असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी मी कडक शब्दांत अधिकाऱ्यांना समज देणार आहे, असे पर्यटनमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.