विशाखापट्टणमहून आटपाडीकडे जाणारे 3 कोटींचे सोने जप्त, सावळेश्वर टोल नाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 3 कोटी रुपयांचे सहा किलो तस्करीचे सोने जप्त केले (gold-biscuits-worth-rs-three-crore-seized-solapur-police) आहे. रविवारी (दि. 14) रात्री 10 च्या सुमारास सावळेश्वर टोलनाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

विशाखापट्टणमहून आटपाडीला एका कारमधून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावळेश्वर टोलनाक्यावर संबधित कार आल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी ती अडवली. त्यात कारचालक आणि अन्य एकजण होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. गाडीत काहीच नसल्याचे सांगतिले. त्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, चालकाच्या सीटखाली लॉकर असल्याचे आढळून आले. ती उघडून पाहिली असता त्यात 1 किलो प्रमाणे सहा सोन्याची बिस्कीटे होती. याबाबत कारचालकाकडे चौकशी केली असता त्याने ही बिस्कीटे आटपाडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, संदीप काशीद, विजय भरले, श्रीकांत गायकवाड, लाला राठोड, बापू शिंदे यांनी केली.

या प्रकरणी सोमवारी सकाळपर्यंत हे सोने चोरीचे आहे की जीएसटी चुकवून आणले आहे. याबाबत पोलिसांची चौकशी सुरु आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.