Gold Rate Today : रेकॉर्ड स्तरावरून सोन्याच्या दरात 6000 रुपयांची घसरण, आज देखील कमी होणार भाव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये आता सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं अमेरिकन डॉलरमध्ये तेजी आहे. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर होत आहे. मंगळवारनंतर बुधवारी देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी ऑक्टोबरच्या डिलीव्हरीचे सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी घसरून 50,180 रुपये प्रतितोळा झाले आहेत. जर चांदीची वायदा किंमतही 1.6 टक्क्यांनी कमी होऊन 60,250 रुपये प्रति किलो झाली आहे. त्यामुळं या आठवड्यात मौल्यवान धातूंच्या किंमतीत सातत्यानं घसरण सुरू आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 100 रुपयांनी कमी झाले होते. तर सोमवारी सोन्याचे दर 1200 रुपयांनी कमी झाले होते.

6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं
गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर हे सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत जवळपास 6000 रुपयांनी सोन्याचा भाव कमी झाला आहे. 7 ऑगस्ट रोजी एमसीएक्सवर सोन्याचे दर 56000 रुपये प्रति तोळापेक्षाही जास्त होते. तर सराफा बाजारात सोन्याचे भाव हे 56,200 प्रति तोळा होते. आता सोन्याचे दर हे 51 हजार प्रति तोळाच्या आसपास आहेत.

परदेशी बाजारात स्वस्त झालं सोनं
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव कमी झाला आहे. परदेशी बाजारात सोन्याची स्पॉट किंमत कमी होऊन 1900 डॉलर प्रति औंस झाली आहे.

का कमी होत आहेत सोन्याचे दर ?
तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची विक्री घटल्यानं त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात झाला आहे. तसंच कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये आता सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं अमेरिकन डॉलरमध्ये तेजी आली आहे. डॉलर निर्दशांक इतरांपेक्षा आठव्या आठवड्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे.