Doller च्या तुलनेत रुपया वधारल्यानं सोन्याच्या भावात घसरण, दिवाळी पर्यंत असू शकतात ‘हे’ दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोन्या-चांदीच्या वायदा बाजारातील किमतीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या 2 महिन्यात रुपयाचा भाव वधारला असून सद्यस्थितीत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 73 ते 74 च्या रेंजमध्ये आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 78 पर्यंत गेला होता. मात्र गेल्या महिन्याभरात रुपयाचा भाव वधारल्यानं सोन्याच्या किंमतीतही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी मल्टी कमोडीटी एक्सचेंजवर म्हणजेच एमसीएक्सवर सोन्याचा वायदा बाजारातील भाव 0.9 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळं सोन्याची किंमत 50,130 रुपये प्रतितोळा एवढी झाली आहे.

सोन्याच्या दरात जरी सातत्यानं घट होत असली तरी ही किंमत पहिल्याप्रमाणे कमी होणार नाही. सद्यस्थितीत सोन्याचा प्रतितोळा भाव 50000 रुपये आहे तर चांदीचा भाव 60 हजार रुपये प्रति किलो एवढा आहे. येणाऱ्या काळातही या भावात कमी जास्त किमती पहायला मिळणार आहेत. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण किंवा वाढ पहायला मिळणार नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. दिवाळीतही सोन्याचा भाव 50 ते 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम असेल असा बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. चांदीच्या वायदा बाजारातही 0.88 टक्क्यांनी घट झाली असून चांदीचे दर प्रति किलो 60,605 एवढे झाले आहेत. दरम्यान ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव 56200 प्रति तोळा एवढा वधारला होता तर चांदीनंही 80 हजार रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला होता.

जागतिक बाजारात सोन्याचे दर

जागतिक पातळीवर सोन्याच्या वायदे आणि स्पॉट दोन्ही किंमतीत घसरण झाली. ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.36 टक्क्यांनी म्हणजेच 6.90 डॉलरने घसरून 1896.30 डॉलर प्रति औंस झाले. याशिवाय सोन्याच्या जागतिक स्पॉट किंमतीत सध्या 0.40
टक्के म्हणजे 6.90 डॉलरची घट होऊन 1896.30 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसला.

जागतिक बाजारात चांदीचे दर

ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक वायदा भाव 1.90 टक्क्यांनी म्हणजे 0.46 डॉलर खाली घसरून 23.98 डॉलर प्रति औंस झाला. त्याचसोबत चांदीच्या जागतिक स्पॉट बाजारातील किंमत 23.91 डॉलर प्रति औंस ट्रेंड होत आहे.