Good News : 4 दिवसांमध्ये सोनं झालं 2 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील आयात शुल्क कपातीची घोषणा केल्यानतंर त्याचे दर कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याचा दर 2 हजारांनी घसरला आहे. तर दुसरीकडे चांदीचा दरही कमी झाला आहे. आताच्या घडीला मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 47 हजार 549 रुपये आहे. त्याआधी सोने 200 रुपयांनी वधारून 48 हजार 049 रुपयांपर्यंत गेले होते. चांदीचा भावातही घसरण झाली असून, एका किलो चांदीचा भाव 68 हजार 356 रुपये झाला आहे.

अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सोने दरात घसरण झाली होती. सोने 2200 रुपयांनी स्वस्त झाले. सोने आणि चांदीमध्ये विक्रीचा सपाटा सुरू राहिल्यामुळे चांदीच्या दरात 3 हजार 280 रुपयांची घसरण झाली होती. एका वेबसाईटनुसार, मुंबई 22 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार झाला आहे. पुण्यातही 22 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार आहे. चेन्नईत 22 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 45 हजार 410 रुपये असून, 24 कॅरेटचा भाव 49 हजार 540 रुपये आहे. तर, कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार 70 रुपये असून, 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 770 रुपये आहे.