नवजात बालकांसाठी शासनाकडून SO CUTE गिफ्ट 

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत आता नवजात बालकांसाठी खुशखबर आहे. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना २ हजार रुपये किमतीचे ‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे बालकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यास एक प्रकारे मदतच होणार आहे.
नवीन वर्षात नवजात बालकांसाठी दिली जाणारी किट संजीवनीच ठरणार आहे. ही योजना २६ जानेवारी पासून लागू होणार असल्याचा शासन निर्णय २९ डिसेंबरला काढण्यात आला आहे. मात्र, नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही तर अनेक नवजात बालक या किट पासून दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बालमृत्यूदर कमी करण्यासाठी खटपट 
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्राची पुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत ० ते ६ वयोगटातील मुलांच्या विकासाकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. ही योजना राज्यात १९७५ पासून राबवण्यात येत आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवली जाते. नवजात बालकांचा विविध कारणांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बालमृत्यू होण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत ठरतात. यात मुख्य म्हणजे आईचे बाल संगोपनाविषयी असलेले अपुरे ज्ञान, तसेच ती राहात असलेल्या ठिकाणाची भौगोलिक वातावरण, परिस्थिती, आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव, त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचे, अशी सर्व कारणे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरतात.
कसे मिळवाल बेबी केअर किट 
बालमृत्यू दर कमी करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत उपाय योजना राबवल्या जात आहेत. पहिल्या प्रसूतीच्या वेळी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात किंवा अंगणवाडी केंद्रात नाव नोंदणी केलेली गरोदर महिला ९ व्या महिन्यात प्रसूत झाल्यास तिने २ महिन्यांच्या आत बेबी किट साठी अर्ज करणे गरजेचे आहे. तिला ताबडतोब बेबी किट उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बेबी किट मध्ये या वस्तूंचा समावेश 
लहान मुलांचे कपडे, प्लास्टिक लंगोट, लहान मुलांना झोपण्यासाठी लहान गादी, लहान मुलांचे टॉवेल, तापमान यंत्र, इलेक्ट्रॉनिक्स थर्मामीटर, लहान मुलांना अंगाला लावण्यासाठी २५९ मिली तेल, मच्छरदाणी, लहान मुलांसाठी गरम ब्लँकेट, प्लॅस्टिकची लहान चटई, ६० मिली शॅम्पू, खेळणी – खुळखुळा, नेलकटर,हातमोजे, पायमोजे ईत्यादी.