Coronavirus : मुंबईत बनवला ‘कोरोना’ला संपवू शकणारा ‘मास्क’, भारतासह अमेरिकेच्या लॅबनेही दिली मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात देखील कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना विरुद्धची लस तयार करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. काही लसीच्या ह्युमन ट्रायलही सुरु झाल्या असून त्यांचे चांगले परिणाम दिसून येत असल्याच्या बातम्या येत आहेत. याचदरम्यान कोरनावर मात करण्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबई येथील एका स्टार्टअपने कोरोनाला रोखण्यासाठी असा मास्क तयार केला आहे. ज्याने फक्त नाका-तोंडातून नाही तर संपूर्ण शरीरातून कोरोना रोखण्यासाठी मदत होणार आहे.

नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून मुंबई स्थित एका स्टार्टअपने कोरोना व्हायरस किलर मास्क तयार केला आहे. याची खास गोष्ट अशी की, या मास्कचा वापर केल्यावर, कोरोना विषाणूपासून संक्रमण पसरवण्याचा धोका देखील पूर्णपणे दूर होतो. तसेच हा मास्क धुवून 60 ते 150 वेळा पुन्हा वापरला जाऊ शकतो. त्यासोबतच असं सांगितलं जात आहे की, मास्क काढताना याची योग्य पद्धत वापरली पाहिजे. काही मास्कना धुवून पुन्हा वापरता येईल तर काहींना वापरता येणार नाही.

जर कोरोना संक्रमित व्यक्ती आपल्या आजूबाजूला असेल तर हा विषाणू त्याच्या श्वासोच्छवासाच्या रुपात हवेमध्ये जाईल आणि नंतर श्वास किंवा तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. अशा परिस्थितीत वाचण्यासाठी मास्क वापरावा लागेल. या मास्कच्या बाहेरच्या भागावर विषाणू चिकटेल आणि तो काही काळच जिवंत राहू शकेल. पण जर तुम्ही मास्क काढताना चुकलात तर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका आहे.

मुंबईस्थित स्टार्टअपने तयार केलेला मास्क थर्मासेन्सचा वापर करून तयार केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा मास्क फक्त कोरोना विषाणू शरीरात जाण्यापासून रोखत नाही तर मास्क बाहेरच्या थराला चिकटलेल्या विषाणूचाही नाश करतो. हा मास्क वापरण्याविषयी लोकांमध्ये विश्वास वाढला आहे कारण यावर भारतातील लॅबसह अमेरिकेच्या लॅबमध्येही संशोधन करण्यात आलं असून मान्यता मिळाली आहे.

हा मास्क वापरल्याने कोरोनाचा धोका टळेल असा दावा यावर संशोधन करणाऱ्यांनी केला आहे. मुंबई स्थित स्टर्टअप थर्मासेन्सकडून असा दावा करण्यात आला आहे की, त्यांनी तयार केलेल्या मास्कला International Organization for Standardization (ISO) प्रमाणित अमेरिकन प्रयोगशाळा आणि भारतातील राष्ट्रीय प्रत्यायन बोर्डने (एनएबीएल) मान्यता दिली आहे.