Google मधील महिला कर्मचार्‍याची आत्महत्या की आणखी काय ?, गुढ वाढलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गुगलमध्ये एचआर एक्सिक्युटीव्ह असणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील मयूर विहार येथे समोर आला आहे. याबाबत परिसरात राहणाऱ्या शेजाऱ्यांनी स्वातीच्या भावाला ही माहिती दिली. घाबरलेल्या स्थितीत स्वातीचा भाऊ अनिरुद्ध दिल्लीत आला असून, तो बहिणीच्या मृत्यूचा न्याय मिळवू इच्छित आहे.

अनिरुद्ध शर्माने शनिवारी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांनी अजूनही गुन्हा नोंद केला नाही. अनिरुद्धने केलेल्या आरोपानुसार, हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी स्वाती शर्माची हत्या केली. तथापि, पोलिसांनी सांगितले की, स्वातीने घरी आत्महत्या केली आहे. पूर्व दिल्लीच्या एसडीएम असलेल्या अनिरुद्ध शर्मा यांचा जबाब नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, मऊ जिल्ह्यात राहणाऱ्या हर्षवर्धन त्रिपाठीसोबत स्वातीचा २०१९ साली प्रेमविवाह झाला. हर्षवर्धनच्या आई वडिलांचा लग्नास विरोध होता. लग्नानंतर स्वाती नवऱ्यासोबत सिंगापूरला गेली. तेथे दोंघात भांडण होत असे. स्वातीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, सासरची मंडळी स्वातीवर दिल्लीत फ्लॅट खरेदी करुन देण्यासाठी दबाव टाकत होते.

दरम्यान, हर्षवर्धन युपीएससीची परीक्षा देण्याचा बहाणा करुन सिंगापूरहून एकटा दिल्लीला आला. दिवाळीत स्वाती सुद्धा सिंगापूरहून दिल्लीला आली आणि पती, सासू-सासऱ्यांसोबत राहू लागली. तथापि, स्वाती वर्क फ्रॉम होम करत होती. स्वातीने भावाकडे तक्रार केली होती की, सासरची मंडळी हुंड्यासाठी मारहाण करतात. त्यातच १९ जानेवारी रोजी स्वातीच्या आत्महत्येची बातमी मिळाली. त्यामुळे सर्वजण हैराण झाले. अनिरुद्धने म्हटले की, स्वाती आत्महत्या करु शकत नाही, कारण गुगल कार्यालयातून तिने दुपारपर्यंत काम केल्याची माहिती मिळत आहे.