सरकारी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी ! महागाई भत्त्याचे रखडलेले 3 हप्ते लवकरच मिळणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना संकटादरम्यान सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा रोखलेला महागाई भत्ता आणि डीआरचे तीनही हप्ते लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी विश्वास दिला की, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे रोखलेले तीनही हप्ते लवकरात लवकर निर्णय घेऊन दिले जातील. सोबतच सांगितले की, त्यांना 1 जुलै 2021 पासून लागू होणार्‍या दराने हप्ते दिले जातील.

केंद्राने वाचवले 37,430 कोटी रुपये
अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, केंद्र सरकारने कोरोना संकटात रोखलेल्या महागाई भत्त्याच्या हप्त्यांमधून 37,430.08 कोटी रुपयांची बचत केली, ज्याचा वापर महामारीला तोंड देण्यासाठी करण्यात आला. त्यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांचा डीआरचा 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे हप्ते रोखले गेले आहेत. आता केंद्रीय कर्मचार्‍यांना 17 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. कॅबिनेटने यामध्ये 4 टक्के वाढीला मंजूरी दिली आहे. यातून महागाई भत्ता 21 टक्के होईल, जो 1 जुलै 2021 पासून लागू होईल.

हे हप्ते मिळणार नाहीत
अर्थ मंत्रालयाने कोरोना संकटाचा विचार करून एप्रिल 2020मध्ये केंद्र सरकारचे 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख पेंशनधारकांच्या महागाई भत्त्यात जुलै 2021 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या वाढीवर प्रतिबंध लावला होता. अर्थ मंत्रालयाने एक मेमो काढला होता की, कोविड-19 मुळे 1 जानेवारी 2020 पासून प्रलंबित केंद्रीय महागाई भत्ता आणि डीआरचा अतिरिक्त हप्ता दिला जाणार नाही. तर, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे अतिरिक्त हप्ते सुद्धा दिले जाणार नाहीत. मात्र, सध्याच्या दरांवर डीए आणि डीआर देणे जारी राहिल.