राज्यपालांकडून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारवर हल्ला चढवण्यात आला होता. या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने विरोधाकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. आज अखेर राठोड यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी सही करून तो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवला. अखेर भगतसिंग कोश्यारी यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

”संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याची माहिती राजभवनातून देण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेचा संताप पाहता, मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांकडे राजीनामा पाठवून दिला आहे. आता पुढील कार्यवाही सुरू ठेवावी.” असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

संजय राठोड यांच्या जागी आता कोणाला मिळणार मंत्रिपद ?

संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.