…म्हणून कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं, जाणून घ्या कशा वाढत होत्या अडचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटादरम्यान सतत सरकारी गाईडलाईन सुद्धा बदलत आहेत. व्हॅक्सीनेशनचा दुसरा डोस किती दिवसानंतर दिला पाहिजे, यावरून निर्माण झालेला वाद संपला नसतानाच आता प्लाझ्मा थेरेपीबाबत नवीन संशोधन समोर आले आहे. केंद्र सरकारने प्लाझ्मा थेरेपीला कोविड ट्रीटमेंट प्रोटोकॉलमधून हटवले आहे. लोक प्लाझ्मा थेरेपीने आपल्या रूग्णाचा जीव वाचवण्याची धडपड करत असताना नॅशनल टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आले की, प्लाझ्मा थेरेपीने फायदा होत नाही.

विशेष म्हणजे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी सुद्धा मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांना यापूर्वीच देशात कोविड-19 उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर तर्कहीन असल्याचे आणि अवैज्ञानिक वापर ठरवत सावध केले होते. मात्र, त्यावेळी याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

आतापर्यंतच्या गाईडलाईननुसार, कोरोनाची सुरूवात झाल्यानंतर सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरेपी वापरण्यास परवानगी होती.

का झाली हटवण्याची मागणी
आयसीएमआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, बीजेएममध्ये छापलेल्या आकड्यांवरून हे समोर आले की, प्लाझ्मा थेरेपीचा कोणताही फायदा नाही. प्लाझ्मा थेरेपी महागडी आहे आणि यामुळे पॅनिक क्रिएट होत आहे. यामुळे हेल्थकेयर सिस्टमवर भार वाढत आहे. तसेच यामुळे रूग्णांना मदत होत नाही. डोनरच्या प्लाझ्माची गुणवत्ता प्रत्येकवेळी ठरवता येत नाही. प्लाझ्माची अँटीबॉडीज योग्य संख्येत असणे आवश्यक असते.

काय आहे प्लाझ्मा थेरेपी
प्लाझ्मा थेरेपीमध्ये कोविड-19 ने बरे झालेल्या रूग्णांच्या रक्तातील अँटीबॉडी गंभीर रुग्णांना दिली जाते. न्यूज रिपोर्टनुसार तज्ज्ञांनुसार 11,588 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीची चाचणी केल्यानंतर आढळले की, यामुळे रूग्णाचा मृत्यू आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्याच्या प्रमाणात कोणताही फरक पडत नाही.

आतापर्यंत राज्य सरकारे केंद्र सरकारच्या कोविड ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या आधारावर लोकांना प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन करत होती. अनेक राज्य सरकारांनी तर आपल्या शहरातून प्लाझ्मा बँक सुद्धा सुरू केल्या आहेत. इतकेच नव्हे, आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी लोक आपला प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी समोर येत होते, परंतु आता यास व्यर्थ म्हटले जात आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की, केंद्र सरकारकडून लोकांना प्लाझ्माबाबत खोटी आशा दाखवली जात होती का?