परळीकरांनी धनंजय मुंडेंना स्वीकारलं की नाही ?, जाणून घ्या जाहीर झालेला 12 ग्रामपंचायतींचा निकाल

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपामुळे काहीसे बॅकफूटवर गेले होते. मात्र तरी देखील परळी मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडे समर्थक पॅनेलने बाजी मारली आहे. मतदार संघातील 12 पैकी 10 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

परळी मतदारसंघातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती. त्यापैकी 10 ग्रामपंचायतीत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र निकाल परिस्थिती आहे. परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या 3 अशा एकूण 5 ग्रामपंचायती आधीच मुंडे यांनी बिनविरोध केल्या होत्या.

त्यानंतर उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर आदी 4 गावात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे. अंबाजोगाईमधील 5 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. अंबलवाडी येथील राष्ट्रवादीचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपूर 7 पैकी 2 उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत.