3000 रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मृत्यूपत्र देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना अंबेजोगाई तालुक्यातील सोनवळा गावच्या ग्रामसेवकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली. अनिल काशीनाथ रोकडे (वय-53) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

तक्रारदार 43 वर्षीय शेतकऱ्याने आजीच्या मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली होती. मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अनिल रोकडे याने तक्रारदाराकडे 3 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदारांनी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी (दि.26) तक्रार दिली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता रोकडे याने तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोनवळा येथे सापळा रचून तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभाकाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांच्या मागर्दर्शनाखाली बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजकुमार पडवी यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.