ढगाळ हवामानामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – निफाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे. या ढगाळ वातावरणाचा व बिगरमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष आणि कांदा पिकाला बसत आहे. पिकांवर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. मोठा पाऊस अथवा गारपीट झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

द्राक्षच्या पंढरीत अवकाळी पावसासह गारठा वाढला आहे. तालुक्यात द्राक्षासह, कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. या हवामानामुळे द्राक्षासह कांद्यावरही रोगराईचे संकट निर्माण झाले आहे आधीच महागाई ने हैराण केलं तर दुसरीकडे या हवामानामुळे पिक वाचविण्यासाठी खर्च वाढला आहे. ढगाळ हवामान व अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसामुळे कांद्यासह द्राक्ष अन् भाजीपाल्याप्रमाणेच रब्बी पिकेही संकटात सापडली आहेत. आर्द्रता आणि गारठ्याला ढगाळ हवामानाची जोड मिळाल्याने पिकांवरील रोगकीडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऐन हंगामात हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले.