पुणे सायबर पोलिसांची मोठी कामगिरी ! ऑनलाइन फसवणूकीच्या गुन्हयांमधील 8 लाख परत मिळवून दिले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सायबर चोरट्यांनी ऑनलाइन पळविलेले 8 लाख रुपये पुन्हा परत मिळवून दिले आहेत. एका घटनेत तर लसीबाबत माहिती घेत असताना नागरिकाचे 2 लाख 40 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधल्याने त्यांचे पैसे परत मिळू शकले आहेत. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी यासाठी मेहनत घेत हे पैसे मिळवून दिले आहेत.

बाणेर परिसरातील एका शिक्षकाला जम्मू काश्मीर येथे जायचे होते. ते विमानाने जाणार होते. पण, त्यासाठी कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांनी ऑनलाइन पाहणी केली आणि त्यात कोरोना टेस्ट किती कालावधी पूर्वी करावी लागते हे पाहिले. त्यात त्यांनी एका विमान कंपनीचा क्रमांक मिळवला व त्यावर संपर्क साधला. तर त्यांना मोबाईलद्वारे सर्व सुविधा देऊ, असे सांगण्यात आले. त्यांना एक ऑनलाइन फॉर्म भरण्यास पाठवला. तो फॉर्म फिर्यादी यांनी भरल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून त्यावर 10 रुपये चार्ज भरा, असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी ती लिंक ओपनकरून 10 रुपये भरले. मात्र यानंतर त्यांच्या डेबिट व क्रेडिट कार्डवरून एकूण 2 लाख 40 हजार रुपये ट्रान्सफर करत फसवणूक झाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले आणि उपनिरीक्षक गवारी यांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी तत्परता दाखवत गवारी यांनी संबंधित पेमेंट मर्चंट यांच्याशी संपर्क साधला. चार मर्चंट यांच्याशी बोलून त्यांना पत्रव्यवहार केला. तसेच त्यांचे गेलेले 2 लाख 40 हजार रुपये पुन्हा त्यांच्या खात्यावर मुळवून देत त्यांचे पैसे परत मिळवून दिले.
अश्याच प्रकारे गेल्या सात दिवसात सायबर पोलिसांनी एकूण 8 लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. त्यात धानोरा येथील संगणक अभियंत्याचे 1 लाळ 94 हजार, कोथरुड येथील व्यवसायिकाचे दीड लाख तसेच एका जेष्ठ नागरिकाचे 94 हजार आणि इतर प्रकरणात ओटीपी शेअर केलेले सव्वा लाख असे 8 लाख रुपये परत मिळाले आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाके, उपनिरीक्षक रवींद्र गवारी, महिला कर्मचारी शुभांगी मालुसरे व स्वाती सावंत यांनी केली आहे. सायबर पोलिसांनी अश्या प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.