‘मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही एमआयएमच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे. एआयएमआयएम (AIMIM) केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला पाठिंबा देईल का? असा प्रश्न एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) विचारला असता. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिले नाही. मात्र मला भारताच्या राजकारणाची लैला बनवले आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र या निकालामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. हैदराबाद महापालिकेत 150 जागांपैकी टीआरएस 56, भाजपा 48 आणि एमआयएमने 44 जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे. पण तिन्ही पक्ष बहुमतापासून दूर आहेत. टीआरएसला बहुमत मिळाले नसले तरीही महापालिकेत ॲडव्हॉन्टेज टीआरएस असे चित्र आहे. पदसिद्ध सदस्यांचे मतदान आणि एमआयएमची भूमिका महापौर निवडीमध्ये महत्त्वाची राहणार आहे. हैदराबादचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे.

टीआरएसने तिहेरी तलाक विधेयकावर सरकारला केंद्र सरकारला पाठिंबा दर्शवला होता. तुम्ही त्या विधेयकाविरोधात होते. अशा परिस्थितीत टीआरएस सोबत जाणे योग्य असेल का? असा प्रश्न ओवैसींना केला गेला. त्यावर ओवेसींनी उत्तर दिले आहे. याच टीआरएसने एनपीआर विरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला. तेलंगणात एनपीआर आणि एनआरसी लागू होणार नाही, असे स्पष्ट केले होते. टीआरएस धोरण वेगळे आहे. आमच वेगळे आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा प्रश्न? तर त्याची अधिसूचना येऊ द्या. आम्ही पक्षात चर्चा करू आणि जो काही निर्णय होईल तो जाहीर करू असे ओवैसी यांनी म्हटले आहे.